लेह लडाख डायरीज- दिवस पाचवा

  दिवस पाचवा
लेह लडाखला यायचे ठरल्यापासून पँगाँन्ग लेक बघायचे आकर्षण होतेच. थ्री इडियट्स बघितल्यापासून ते मोरपिशी रंगाचे देखणे तळे मनात घर करुन बसले होतेच.पँगाँन्गला जाताना आपण जगातल्या दुसर्या क्रमांकाच्या  सर्वाधिक उंचीवरच्या रस्त्याने जातो. 
हे सर्व ऐकून होतो. त्या लेकचे देखणे फोटो बघून आज पँगाँन्गला जायचे विचार करूनच मस्त वाटत होतं. पण पण पण....
  आपल्याकडे एक म्हण आहे 'घी देखा मगर बडगा नहीं देखा'!!!  तसा बडगा इथेही आहे. तो कोणी सांगतच नाही 😁
लेहहून चांग ला मार्गे पँगाॅन्गला जायचे अंतर फारतर दीडशे किलोमीटर असेल नसेल. पण जगातला दुसर्या क्रमांकाचा उंच रस्ता इथे असला तरी जगातल्या सगळ्या वाईट रस्त्यांचा बाप रस्ता तो आहे हे कुठे आपल्याला माहीत असतंय! चांग ला नावानेच चांग ला, रस्ता मात्र बिलकूल नाही चांगला 😜
पहाटे साडेपाचलाच निघालो. पहिले तीस चाळीस किलोमीटर मस्त रस्ता आहे. नंतर जो काही रस्ता सुरु होतो तो काय विचारता.  या रस्त्यावर काय वाईट नाही असे नाहीच! वळणं हवीत?  चांगली हेअरपिन वळणं आहेत. बर्फ हवा? बर्फाच्या भिंतीच दोन्ही बाजूला आहेत. मधे बर्फ वितळून त्याचे पाणी रस्त्यावर जमून रस्ता गायब आहे. काही ठिकाणी बर्फाचे भलेमोठे खडे गाडीला आडवे यायचे. मग ड्रायव्हर जरासा फोडुन गाडी पुढे न्यायचा. जरा पुढे बघावे तर बाजूने अजस्त्र हिमभिंत खाली खोल दरी. नाजूकसा रस्ता उगाच वळ वळ वळतोय. त्यात समोरून बायकर्स येतात. त्यांना जागा करुन देताना गाडी दरीशी लडिवाळ सलगी करु पाहते. आपण हताशपणे एकदा डावीकडे एकदा उजवीकडे,टपाकडे किंवा समोर आदळण्याचे सुरु ठेवावे. दोनेक तास जातात.
हळूहळू आपण त्या वेडेपणाला सरावतो! मग सभोवताली आपण काय अप्रतिम सौंदर्यपूर्ण देखाव्याचे साक्षी आहोत याची जाणीव अलगद झिरपू लागते.  एरवी आपण एखाद्या हिलस्टेशनला दुरून बर्फ बघतो. इथे आपण साक्षात हिमालयाच्या अंगाखांद्यावरुन जात असतो. भोवताली प्रचंड मोठी हिमशिखरं, शुभ्र ग्लेशियर्स आणि वरुन कापूस पिंजल्यासारखा भुरभुरणारा बर्फ. आपोआप हिमभूल पडतच जाते.
अचानक समोरून एखादे खतरनाक वळण येते. ते वितळणाऱ्या बर्फाने सरसरीत चिखलमय झालेले असते.  त्यावरून गाडी सर्रकन वळते आणि खाडकन् भूल उतरून सरणार कधी रण वाटायला लागते! मध्येच जरा कमी खड्डेमय रस्ता येतो. मध्येच गाडी दणादणा उडते इतका खराब. शेवटी चांगला रस्ता आहे असे ड्रायव्हर धीर देत असतो. मग आम्ही रस्त्यांच्या तीन कॅटेगरीच सुरु केल्या. कमी खड्डे राहुल गांधी, भयानक रस्ता ममता बॅनर्जी रस्ता आणि नंतर म्हणे मख्खन रस्ता येणार आहे म्हणून 'आएंगे तो मोदीही'रस्ता! !
असे करत करत शेवटी एकदाचे मोदीजी सुरु झाले. तोपर्यंत निघून चार तास सहज होऊन गेले असावेत. एखाद्या सुंदर स्त्री ने तिचे मुखकमल लपवून ठेवावे तसे डोंगरामागून डोंगर जात राहतात. पण लेकसदृश काही दिसत नाही.  पाच तासांनी शेवटी गाडीने एक वळण घेतले आणि दिसले गं बाई दिसले मला पँगाॅन्ग लेक दिसले!
गाडीतून उतरताना मी अष्टावक्रा झाली असणार याची मला खात्रीच वाटत होती 😁 उजवीकडची हाडं डावीकडे आणि डावीकडील उजवीकडे गेली असायची शक्यता दाट होती.  त्यामुळे आधी आपली खिळखिळी हाडं सरळ करुन समोर नजर टाकावी हे बरे!
वरुन खाली येत असतानाच ते चित्रातले वेगवेगळे रंग दिसतात.  निळ्या, हिरव्या,मोरपंखी रंगाच्या नीलमण्यासारखे ते तळे उन्हात लखलखत होते. मात्र आम्ही जवळ पोहोचेपर्यंत आकाश ढगाळले. त्यामुळे जवळून तळे राखी रंगाचे वाटत होते. आतले पाणी नितळ. दगड न दगड मोजून घ्यावा. बाजूने देखणे हिमाच्छादित पर्वत या नीलमण्याला कोंदण असल्यासारखे साजरे उभे आहेत.वेगवेगळे सुंदर पक्षी तळ्यात विहरत असतात. हे खा-या पाण्याचे तळे आहे. आपल्याकडे याचा फक्त १/३ भाग येतो. बाकीचा फोटोत जे डोंगर दिसतात त्या चीनच्या भागात येतो.
वर आलो की साक्षात थ्री इडियट्सचे सिन काठावर उभे केले आहेत. अगदी हेल्मेट स्कूटरसह! जोरदार वा-याने प्रचंड थंडी वाजत होती पण सगळ्या पोझमध्ये फोटो तर घ्यायलाच हवेत 😜  बघा खाली !
त्या थंडीवा-यात जेमतेम तासभर थांबून लगेचच निघालो  आणि बरोबर पाच तासांनी आता अर्ध्या तासात पोहोचू बाबा असे वाटत असतानाच गाडीतून खडखड आवाज सुरु झाला आणि ती एका साईडला आदळुन बंद पडली! रस्त्यावर जागोजागी आपटलेल्या बर्फाच्या दगडांनी गाडीचा कोणतातरी भाग तुटला! नशीब त्या भयाण रस्त्यावर काही  न होता सुखरूप पार पडला प्रवास.  दहा मिनिटांत दुसरी गाडी आम्हाला घेऊन हाॅटेलवर सोडून गेली. तर असा संस्मरणीय दिवस पार पडला आहे!
    लेक सुंदर आहेच प्रश्नच नाही. पण खरं सांगू त्या साहसी प्रवासाची मजाच जास्त वाटते आहे! खरोखरच एवढा प्रवास करण्याइतके ते worth आहे का असा विवादास्पद प्रश्न पण छळतोय. सांगू नका कोणाला. मला वेड्यातच काढायचे!












जाताजाता...
लहान मुलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना नेण्याची ही ट्रिप नाही. हे adventure tourism आहे लक्झरी नाही. आर्मीचे काॅन्व्हाॅय सुरु झाले की आपली गाडी तासन् तास अडकून पडू शकते. रस्त्यावर सर्वत्र घसरडे बर्फ आहे. थांबायला जागा किंवा वाॅशरुम नाहीत. त्यामुळे त्यांचे हाल होऊ शकतात. याचा विचार जरुर करावा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)