लेह लडाख डायरीज- दिवस आठवा
शेवटचा दिवस! आज आरामाचा दिवस होता. सकाळी हाॅटेलमधून समोरच डोकावणार्या शांती स्तूपाला भेट देऊन आलो. जपानी सहकार्याने बांधलेल्या या स्तूपाच्या टेकडीवरून लेह शहराचा ३६० डिग्री देखावा दिसतो. श्रीनगरच्या शंकराचार्य टेकडीची आठवण येते. डावीकडे खारदुंगलाचा रस्ता बारीक केसासारखा दिसतो. तिथल्या पहाडाची पाच बोटं आता आठ दिवसात ओळखू यायला लागली आहेत. उजवीकडे स्टोक कांगरी शिखर उन्हात लखलखतं आहे. समोरच लेह पॅलेस डोकावतोय. आज शेवटच्या दिवशी माऊंट सिकनेस डोकं वर काढतोय का काय असं डोकं दुखतंय! त्यामुळे चक्क स्तूपाच्या मेडिटेशन सेंटरमध्ये निवांत बसून ॐकाराचा जप करत बसले! यानंतरचे ठिकाण हाॅल आॅफ फेम म्युझियम. डोकं धरुन बसले होते. जाऊ का नको जाऊ करत. पण गेले आणि ते अप्रतिम म्युझियम बघून गेल्याचे अगदी सार्थक झाले. वेळ काढून जायचे म्युझियम आहे हे. आपल्या सेनेच्या लेह लडाख, कारगील, सियाचेनच्या मोहिमा ,लढाईचा इतिहास याचे अतिशय उत्तम डाॅक्युमेंटेशन फोटो ,पत्र, माहिती पत्रकं, माॅडेल्स असे सर्व माध्यमातून इथे जतन केलेले आहे. लडाखच्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी जमले तर हे म्युझियम बघावे. म्हणजे लडाखचा...