औंध कास भटकंती (भाग -२)
सोमवारी सकाळी उठून रूमबाहेर पाहिलं तर थेट समोर खोल दरी.आणि खालचं सातारा शहर सुर्योदयाबरोबर जागं होत होतं. निवांत मधला छानसा नाश्ता आटोपून आम्ही कासला जायला सज्ज झालो.हॉटेलवाल्यांनी आवर्जून कुमुदिनी तलाव बघाच असं सुचवलं होतं.तो म्हणे फुलांनी भरून गेलाय.त्यामुळे अगदी उत्सूक होऊन कॅमेरे परजून निघालो.अगदी अर्ध्या तासाच्या आतच पठारापाशी पोचलो.तिथे आमच्याकडून कॅमेरा, पार्किंग आणि कर मिळून १३० रु घेतले.राजमार्गावरून सरळ जा,गाडी जाते असे हॉटेलमधून कळले होते.तिथे गेल्यावर मात्र तिथल्या रखवालदाराने फक्त पवनचक्कीवाल्यांच्याच गाड्या जातात आणि दूरवर दिसणार्या पवनचक्कीजवळच कुमुदिनी तलाव आहे अशी गूड न्यूज दिली!एक मात्र बरं होतं.फारसं कोणीही आलेलं नव्हतं आणि हवेत गारवा होता.मग निघालो ११ नंबरची बस पकडून रमतगमत! सुरुवातीला ते अंतर बघून चालण्याची धडकी भरली तरी लवकरच त्याचे अनेक फायदे आजूबाजूला दिसायला लागले.झाडांवर चिवचिवणारे अनोखे पक्षी,अगदी जवळून उडणारी सुंदर फुलपाख्रं बघत बघत अंतर आपोआप विसरायलं झालं.एका झुडपापाशी दोन काळी मोठी पतंग फुलपाखरं इतका दंगा करत होती की बस! त्यांना कॅमेरात पकडायचा एकही प्...