माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग -५)
काप्री करून आमची सहल परत नेपल्स मुक्कामी आली तोवर रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.परत ते "प" पासून नाव असणारे पदार्थ खायची जराही इच्छा नव्हती! म्हणून एखादे फळ खाऊन घेऊ ठरवून भोजनगृहात गेले तर तिथे म्हणे आज व्हरायटी आहे इटालियन जेवणाची.खाऊन तर बघा! म्हंटलं बघूया! मग शेफने लसान्या आणि ब्रुशेट्टा अगदी दिमाखात स्वतः येऊन वाढलं.हे दोन्ही पदार्थ आमच्या डोंबिवलीच्या प्रसाद हॉटेलमध्ये मी बर्याचदा खाते.चक्क चांगले लागतात! पण इथे लसान्या म्हणजे चामट पास्ता शीट्स मध्ये बेक करून चीज.निव्वळ वाईट लागत होते.ते सोडून ब्रुशेट्टा खावे तर त्यात कोरड्या ब्रेड्वर फक्त टोमॅटो घातलेला! आमच्या डोंबिवलीकर शेफकडून इटालियन शेफला ट्रेनिंग देणे अत्यंत जरूरी आहे अशी खूणगाठ मनाशी बांधून जेवणातून पळ काढला!दुसर्या दिवशी ट्रेवी फाऊंटन आणि वॅटिकन सिटी असा मोठा दौरा होता. सकाळी लवकरच बस निघाली.तीन तासांनंतर रोममधल्या एका बोगद्यापाशी सर्वांना सोडून बस गेली.इथुन पुढे पर्यटकांच्या बस रोमच्या आत येऊ शकत नाहीत.इथून रोमचा पदयात्री पण अतिशय गर्दी असणारा विभाग सुरू झाला.जिथे बघावे तिथे हिन्दी चिनी भाई भाई! आजूबाजूल...