जेथे आशियाला युरोप मिळते. ( इस्तंबूल भाग ३)
जेथे आशियाला युरोप मिळते (इस्तंबूल भाग ३) लेखिका- अंजली मरकळे आज सकाळी लवकर उठायचे ठरवूनच बाहेर पडलो. रात्री परत येताना जवळच्या मार्केटमधून सोबत ब्रेड बटर केळी घेऊनच आलो होतो. त्यामुळे पटापट रुमवरच नाश्ता केला आणि निघालो. आज घाई करायची होती कारण आजचे पहिलेच ठिकाण होते हजारो वर्षापासून उभे असलेले इस्तंबूलमधले गुलाबी ऐश्वर्य हागिया सोफिया. हे म्युझियम कम चर्च कम मशीद बघायला कमीत कमी तीन तास लागतात. शिवाय त्याच्या समोरच प्रसिद्ध ब्लु माॅस्क आणि तिच्यामागे इस्तंबूलचे रोमनकालिन अवशेष हिप्पोड्रोम आहेत. नेहमीप्रमाणे तक्सिम काबातास फ्युनिक्युलर आणि काबातासहून T1 ट्राम घेऊन सुलतान अहमेत स्टेशनवर उतरलो. उतरलो की समोरच हागिया सोफिया आणि ब्लु माॅस्क दिसतात. त्यांच्याकडे तोंड केले की डाव्या हाताला चालत हागिया सोफिया लागते. त्याच्या प्रवेशद्वारावर प्रचंड मोठी रांग. पण हमारे पास म्युझियम पास था ना! मग रांगेत पुढे जाऊन तो दाखवताच तिळा तिळा दार उघड केल्यासारखे तिथल्या रखवालदाराने आत घेतले. आत परत वैयक्तिक तपासणी अाणि बॅगेचे स्कॅन करावे लागते. ते करुन मग पास दाखवून आपण ह...