लेह लडाख डायरीज- दुसरा दिवस

दुसरा दिवस:
रात्री -१ तापमान झाले आणि कुडकुडत सगळे दुलयांमध्ये पळाले!
सकाळी आठला आम्हाला नेणाऱ्या झायलो तयारच होत्या. आमचा ड्रायव्हर आता सगळे दिवस तोच असणार आहे. हे सगळे लडाखी अतिशय सज्जन देवभोळे लोक आहेत. रस्त्यावर जागोजाग प्रार्थना चक्र आहेत. त्याला प्रदक्षिणा घालत गाडी पुढे न्यायचा. तेवढेच पुण्य जमा! रस्त्यावर सर्वत्र पताका आणि प्रार्थना लिहिलेले झेंडे त्याने अत्यंत भाविकपणे दाखवल्या. त्या पताका वा-याने हलल्या की सर्वांपर्यंत त्यातले पुण्य पोहोचते !
पहिला स्टाॅप होता Shey palace . ही लडाखच्या राजाची जुनी राजधानी.
याच्या समोरच हिमालयाच्या लडाख आणि झंस्कार रांगा दिसतात. ट्रेकर्सचे लाडके स्टोक कांगरी शिखर तर अगदी हाताच्या अंतरावर असल्यासारखे भासते इथून.  सकाळच्या उन्हात सगळीच शिखरं लखलखत होती.




 सिंधू नदी या लडाख रांगामधून वाहते.
समोर उन्हाळ्यामुळे कुरणं हिरवीगार पसरली आहेत. असा देखणा नजारा बघत आपला दमसाँस सांभाळत हळूहळू वर चढत गेलो की मुख्य मंदिराचा स्तूप आणि माॅनेस्ट्री लागते. खुद्द राजाचा निवास तिथे पूर्वी होता. त्यामुळे महत्त्वाचे अवशेष असणारे स्तूप इथे आहेत. मुख्य मंदिरात तीन मजली शाक्यमुनी बुद्धाची सुरेख सोनेरी मूर्ती आहे.

      लेह खर्या अर्थाने प्रसिद्ध झालं थ्री इडियट्समधल्या पँगाॅग लेक आणि रँचो स्कूलच्या सिनमुळे! हे रँचो स्कूल आमचा पुढचा स्टाॅप होता. पूर्वी आतपर्यंत जाता येत असे. पण लोक तिथल्या मुलांना वर्ग सुरु असताना पिडायला लागले! मग आता त्यांनी एक थ्री इडियट्स भिंत करुन दिलीय. काढा फोटो आणि पळा! मग काय आम्ही काढलेच फोटो 😜


यानंतर सिंधु नदीच्या कडेकडेने प्रवास करत पोहोचलो हेमिस गोंपा बघायला.
इथे पद्मसंभवाची मूर्ती पुजली जाते. दृक्पा या बुध्दिस्ट पंथाचे हे मुख्य केंद्र आहे. इथेच प्रसिद्ध हेमिस फेस्टिव्हल साजरा होतो. इथले मुख्य आकर्षण इथले अनेक प्राचीन वस्तूंचे म्युझियम आहे. ते चुकवू नये असेच.


परतीच्या प्रवासात चंबा नावाच्या सुरेख हाॅटेलात जेवलो.संध्याकाळी लडाखी नृत्य गायनाचा अतिशय देखणा कार्यक्रम झाला.  लडाखच्या निरनिराळ्या भागातले सांस्कृतिक दर्शन घडल्याने हा भाग किती समृद्ध आहे आणि इथला आपल्याला ना इतिहास ना भूगोल माहिती याची लाज वाटली 😒




तर जाताजाता आजची लडाख टीप- लडाख भारतातला दुसर्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. त्याहून मोठा जिल्हा गुजराथमधले भुज !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)