लेह लडाख डायरीज- दिवस आठवा
शेवटचा दिवस!
आज आरामाचा दिवस होता. सकाळी हाॅटेलमधून समोरच डोकावणार्या शांती स्तूपाला भेट देऊन आलो. जपानी सहकार्याने बांधलेल्या या स्तूपाच्या टेकडीवरून लेह शहराचा ३६० डिग्री देखावा दिसतो. श्रीनगरच्या शंकराचार्य टेकडीची आठवण येते. डावीकडे खारदुंगलाचा रस्ता बारीक केसासारखा दिसतो. तिथल्या पहाडाची पाच बोटं आता आठ दिवसात ओळखू यायला लागली आहेत. उजवीकडे स्टोक कांगरी शिखर उन्हात लखलखतं आहे. समोरच लेह पॅलेस डोकावतोय.
आज शेवटच्या दिवशी माऊंट सिकनेस डोकं वर काढतोय का काय असं डोकं दुखतंय!
त्यामुळे चक्क स्तूपाच्या मेडिटेशन सेंटरमध्ये निवांत बसून ॐकाराचा जप करत बसले!
यानंतरचे ठिकाण हाॅल आॅफ फेम म्युझियम. डोकं धरुन बसले होते. जाऊ का नको जाऊ करत. पण गेले आणि ते अप्रतिम म्युझियम बघून गेल्याचे अगदी सार्थक झाले. वेळ काढून जायचे म्युझियम आहे हे. आपल्या सेनेच्या लेह लडाख, कारगील, सियाचेनच्या मोहिमा ,लढाईचा इतिहास याचे अतिशय उत्तम डाॅक्युमेंटेशन फोटो ,पत्र, माहिती पत्रकं, माॅडेल्स असे सर्व माध्यमातून इथे जतन केलेले आहे. लडाखच्या ट्रिपच्या पहिल्या दिवशी जमले तर हे म्युझियम बघावे. म्हणजे लडाखचा इतिहास, भुगोल ,कारगिलची पार्श्वभूमी नीट उलगडायला मदत होईल. मला अतिशय आवडली इथली सियाचेन गॅलरी. तिथे सैनिक कसे राहतात, कसे कपडे घालतात,त्यांना रसद कशी येते हेलिकॉप्टरने ,त्यांचे सामान कसे येते, तिथले तंबू एक ना अनेक वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. त्यावरून सैनिक सियाचेनला कसे राहत असतील याची व्यवस्थित कल्पना येते.
इथेच लडाखबद्दल माहिती पण फार सुरेख संकलित केलेली आहे.
लडाखमधून येताजाता एक लांब शेपटाचा काळा पांढरा पक्षी सतत दिसत असे. तो मेगपाय किंवा पिका पिका इथला कायमचा रहिवासी आहे. तसेच पँगाँन्गला जाता येता एक मुंगसासारखा मातकट फर असणारा प्राणी हमखास दिसतो. हा इथला मरमाॅट. उन्हाळ्यात खा खा खाऊन ढब्बू व्हायचे आणि उरलेले सहा महिने जमिनीखाली पडी मारायची असा हेवा वाटणारा आयुष्यक्रम असतो याचा! लोक याला थांबून खाऊ घालतात. त्यामुळे या प्राण्याच्या सवयी बदलायला लागल्या. त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून गंमत वाटत असली तरी याला फक्त लांबून बघायचे आहे. खायला घालणे दूरच.
आता संध्याकाळी लेह मार्केटची एक फेरी मारून बॅक टु पुणे. लेह मार्केटला फिरणे मस्त अनुभव आहे. एकतर संपूर्ण पादचारी विभाग आहे. टिपिकल लडाखी दागिने, पेडंट्स, पश्मिना स्वेटर, शाली ,काश्मिरी वस्तू आणि सुंदर लडाखी टी शर्टस इकडून घ्यायचेच. लडाखी दुकानात दलाई लामांचे फोटो असतात. हे लोक सहसा फसवणार नाहीत. चारच महिने कमाईचे त्यांच्या. घ्या काहीतरी.
माझी मैत्रीण Kavita ने इकडून मेडिटेशन बाऊल मागवलेला. तो हँडमेड शोधता शोधता आम्हालाच त्याच्या नादाचा नाद लागून दोन बाऊल घेतले गेले!
इथे मार्केटमध्ये एक dzomsa म्हणून दुकान जर्मन बेकरीशेजारी आहे. तिथे सन ड्राइड अॅप्रिकाॅट्स, अॅपल, लिपबाम अशा अनेक आॅर्गॅनिक हँडमेड गोष्टी मिळतात. इथेच लेहबेरी आणि अॅप्रिकाॅट ज्यूस ताजा ताजा पिऊन पहाच. मग रमतगमत मार्केटची फेरी आणि आपला लडाखचा प्रवास संपवायचा!
प्रथमच एखादी ट्रिप संपतात घरचे वेध न लागता अजून थांबावे ,इथल्या शांततेचा भाग व्हावे असे काय काय वाटते आहे. हिमालय खरंच गारुड करतो बहुतेक ....
जाताजाता .....
आज शेवटचेच! पण वाचा नक्की
लडाख हिमालयाच्या पर्जन्यछायेच्या विभागात येते. इथे पाऊस अगदी कमी. पाणी ग्लेशियरचे वितळून येणारे चार महिने. इथे कमी आॅक्सिजनमुळे कचरा जाळता येत नाही. आपण पर्यटक म्हणून प्रवास करताना पाण्याच्या बाटल्या वापरत राहतो. ते पाणी इथे दुरून आणावे लागते ट्रकलोडने. या बाटल्या प्रत्येकी किमान दिवसाला दोन अशा आठवडाभराच्या बारा ते पंधरा माणशी .एवढा कचरा इथल्या लँडफिल्समध्ये जातो. नष्ट न होता. आपण जर रिकाम्या बाटल्या निघताना हाॅटेलमधून भरुन घेऊन प्रवास केला तर आपण निदान आपल्यापुरता कचरा आणि कार्बन फुटप्रिंट कमी करायला मदत करु शकू. विचार कराच यावर ही विनंती _/\_
* समाप्त *

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा