जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल( भाग ४)
जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग ४)- अंजली मरकळे आज सकाळी लवकर उठून ब्रेकफास्टला हजर झालो कारण आजच्या दिवशी अनेक गोष्टी बघायचे साधायचे होते. तक्सिम सुट्समध्ये छानपैकी आॅम्लेट ,सब्जेली पिडे आणि तुर्की चाय पिऊन मोर्चा वळवला तक्सिम स्क्वेअर स्टेशनकडे. आजचे पहिले ठिकाण होते सुलेमानिये मशीद. आज नेहमीसारखी फ्युनिक्युलर न घेता मेट्रोने प्रवास करायचा होता. नेहमीचेच इस्तंबूलकार्ट तिथेच रिचार्ज करुन घेतले. आणि डावीकडे येनीकापीच्या M2 मेट्रोकडे दाखवणारा बाण बघत प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. अगदी वेळेत फारशी गर्दी नसणारी मेट्रो आली. आम्ही Vezneciller स्टेशनवर उतरलो. प्रत्येक स्टेशनजवळ कोणते बघण्याचे ठिकाण आहे हे देखील बोर्डवर लिहिलेले असते. त्यामुळे चुकीच्या स्टेशनवर वगैरे आपण जात नाही! उतरून मग बरेच मजले चालून आपण स्टेशनबाहेर येतो. बाहेर आल्यावर नेमके कुठे जावे कळत नाही कारण मशिद समोर दिसत नसते. बाहेरच असणाऱ्या टपरीवर विचारल्यावर त्याने मागे बोट दाखवले! त्यावरून कसे कळावे? मग गुगलबाबाला विचारले. त्याने बरोब्बर सांगितले स्टेशनकडे पाठ केली तर उजव्या हाताला वळून समोर दिसणारा रस्ता वर चढत...