औंध कास भटकंती (भाग -१)

गणपतीबाप्पा त्यांच्या घरी परतले आणि आम्हाला भटकंतीची ठिकाणं खुणावायला लागली. मात्र दिवसाचे गणित काही जुळेना.मला क्लिनिक एक दिवसावर बंद करणे अशक्य होते.मग रविवार सोमवार कुठेतरी जायचंच ठरवलं.नेमकं तेव्हाच पेपरमध्ये कासचे फोटो येऊ लागले.गणपतीच्या दिवसात जो थोडाफार पाऊस झाला त्यानंतर फुललेले पठार.ते बघून कासला जाण्याचे निश्चित केले.रविवारी कास टाळायचे होते. तिथल्या गर्दीचं वर्णन ऐकून होतो.मग रविवारी कासच्या जवळपासची ठिकाणं करुन कासजवळच्या निवांत रिसाॅर्टला रात्री रहायचे.सकाळी उठून कास बामणोली करुन परतायचे असा बेत फायनल झाला.कास जवळची ठिकाणं शोधताना औंध जवळच असल्याचं लक्षात आलं.मग रविवारी औंध यमाई देऊळ संग्रहालय आणि ठोसेघरचा धबधबा असा कार्यक्रम ठरवला.
रविवारी अगदी पहाटे पावणे पाचलाच निघालो.कारण त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती. कुठे मिरवणूकीमुळे अडून राहण्यापेक्षा पहाटे बरं असा विचार करुन लवकर निघालो.त्या शांत वेळात रहदारीही अगदी तुरळक.आकाशात झुंजूमुंजू व्हायला सुरुवात झालेली.

अर्ध्या तासात खंडाळ्याला पोहोचलो.तिथे चक्क कुडकुडायला लावणारी थंडी होती पहाटे.थंडीत मस्त गरम चहा घेऊन सोबतची सँडविचेस खाऊन सुसाट निघालो.मग थेट शिरवळलाच थांबलो.तिथला श्रीरामचा वडापाव मिसळ कोण चुकवणार! शिरवळहून निघालो ते सातारा पार करुन औंध रस्त्यालाच लागलो.आता रस्त्याने उसाचे मळे ,ट्रॅक्टरमधून मिरवत जाणारे गणपतीबाप्पा जागोजागी दिसायला लागले.बघता बघता टेकडीवरचं यमाईचं देऊळ दिसायला लागलं.टेकडी चढून गाडी थेट मंदिरापर्यंत जाते..वरून भोवतालचा परिसर छान हिरवागार दिसत होता.समोर दगडी चिर्‍यांनी बांधलेलं ,दोन दीपमाळा तटबंदी मिरवणारं देखणं देऊळ आहे.अगदी स्वच्छ प्रांगण.आम्ही सोडून फारसं कोणीच नव्हतं देवळात.देवीचं निवांत दर्शन घेतलं.देवीची मूर्ती पण छान आहे. मोठी.सोन्याच्या मोठाल्या डोळ्यांनी आपल्याकडे बघणारी! मंदिरातून बाहेर पडलं की डाव्या हाताला पायर्‍या लागतात.त्या थेट संग्रहालयाकडे नेतात. प्रांगणात छान दगडी महिरपीच्या ओवर्‍या आहेत.तिथे गारव्यात जरा वेळ बसलो शांत.



( हा फोटो जालावरून साभार.मंदिराच्या आत कॅमेराला परवानगी नाही.)
छान गार वारा वाहात होता.ओवर्‍यांवर आमच्या गप्पांचा फड जमलाच मग! तोवर इतर लोक यायला सुरुवात झाली.यमाई बर्‍याच मराठी लोकांचे कुलदैवत आहे.त्यामुळे नविन लग्न झालेल्या जोडप्यांची वर्दळ वाढायला लागली तसे आम्ही निघालो.खाली भवानी वस्तू संग्रहालय आहे.अगदी नाममात्र तिकिट काढून आपल्याला प्रवेश मिळतो.आवारातच अनेक वीरगळ ठेवलेले आहेत.

बर्‍याच दिवसापासून हे संग्रहालय बघायचे होते.मुख्यत: तिथल्या चित्र आणि शिल्पांसाठी.औंधचे राजे भवानराव पंत प्रतिनिधी हे स्वतः चांगले चित्रकार आणि दर्दी होते.कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी कोट्याळकरांसारखे चित्रकार त्यांनी जेव्हा तीन चार रुपये पगार असे त्या काळात साठ रुपये पगारावर दरबारात मानाच्या स्थानी घेतले होते.स्वतः बाळासाहेबांनी त्यांच्या देश विदेशाच्या दौर्‍यांमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू, चित्रं विकत घेऊन त्यांचा संग्रह केलाच.पण संग्रहालय कसे उभारावे याचे परदेशी जाणकारांकडून ज्ञान घेऊन नैसर्गिक उजेड आणि प्रकाश व्यवस्थेने परिपूर्ण असे प्रशस्त संग्रहालय उभारून ते लोकार्पण केले.राजा रवीवर्म्याला उत्तेजन देण्यासाठी त्याला मदत करणारे राजे हे औंधाचे बाळासाहेब पंत प्रतिनिधी आणि बडोद्याचे सयाजीरावमहाराज. अनेक देशी विदेशी चित्रकारांच्या ओरिजिनल तसेच प्रतिकृती हे या संग्रहालयाचे खास आकर्षण.
संग्रहालयाच्या सुरूवातीलाच या राजाचे सुंदर पोर्ट्रेट आहे.त्यावरून त्या चित्रकाराबद्दल अपेक्षा फार उंचावल्या.लगेचच पुढच्या दालनात त्या धप्पदिशी खालीही आल्या! या दालनात कोट्याळकरांनीच काढलेली काही सुरेख पोर्ट्रेट्स आहेत आणि पौराणिक प्रसंगावरची काही चित्रं. यात शीव तांडव नृत्य यावर त्यांचीच तीन चित्रं आहेत.ती अगदीच बाळबोध तर आहेतच पण त्यातल्या रचनेमुळे जरा हास्यास्पद पण आहेत! एका चित्रात शंकर नृत्य करतोय आणि पार्वती गातेय.ती गातेय ते अगदी तमाशातल्या बाया एक हात कानावर आणि एक हात हवेत उडवून गातात तशी.शंकर त्या गाण्यामुळेच तांडव करतोय की काय असे वाटून हसायला आले ! बरं तांडव करतानाही शंकराच्या चेहेर्‍यावर अगदी अष्टसात्विक भाव! एका चित्रात सरस्वती एका हातात खांबासारखी वीणा घेऊन उभी आहे.बाजूला छोटे नागडे गणपती आणि कार्तिकेय 'माझ्या गणाने घुंगरूवर' नाच करत आहेत अशा पोझमध्ये! आणि बाजूला एक मोर नाच रे मोरा आज्ञेची वाट बघत असल्यासारखा!असो!!
पुढच्या काही दालनांमध्ये मात्र अप्रतिम कलाकुसरीच्या वस्तू आहेत.विशेषत: चंदनात अखंड कोरलेले शिवचरित्र अगदी पाहावे असे.किरीट अर्जून युद्धावर एक बंगाली चित्रमालिका तर मजलाभर पसरलीये.अनेक हस्तीदन्ती कोरीव वस्तू,जपानी वस्तू पण बघण्यासारख्या. संग्रहालयाचे जिने नेमके पोचवत रहतात.कुठे शोधत जावे लागत नाही.खालच्या मजल्यावर देशी आणि विदेशी चित्रकारांची चित्रं आहेत.त्यात रवीवर्म्याची प्रसिद्ध सैरंध्री,दमयंती भेटल्या! याआधी बडोद्याला रवीवर्म्याची ओरिजिनल चित्रं बघितली होती.चित्रात देवी असो वा सैरंध्री सगळ्या त्याला आवडणार्‍या नऊवारी पातळात.चेहेरेही सारखेच.तरीही ही चित्र मला आवडतात.कदचित त्यातल्या भावदर्शनामुळे.



(सर्व चित्र जालावरून साभार.आत कॅमेराला परवानगी नाही)
पुढच्या एका दालनात ठाकूरसिंग यांचं तैल रंगातलं प्रसिद्ध 'ओलेती' चित्र आहे.आवर्जून बघावं असं.
याच्या आधीच्या दालनात परत एकदा करमणूक करणारी काही चित्र दिसली.इथे व्हेनिसचा देखावा या शीर्षकाखाली काप्री आणि सोरेन्तो या इटलीतल्या ठिकाणांची बाळबोध चित्रं आहेत.काही चित्रात तर व्हेनिसमध्ये व्हेसुवियस ज्वालामुखीतून धूर पण येतोय!या आणि सर्व चित्रांखाली जे इंग्रजीतून त्याचे वर्णन आणि शीर्षकं दिली आहेत ती वाचून तर भलतीच करमणूक होते.विलाप करणार्‍या गोपिका या चित्राखाली इंग्रजीत 'गोपिका इन फ्युजन' असे लिहिलेले आहे!काही ठिकाणे मराठी शब्दाचे शब्दशः इंग्रजी भाषांतर दिलेले आहे! मग मी जरा टेन्शनमध्येच ओलेतीचं शीर्षक वाचलं! पण ते इंग्रजीतही ओलेतीच होतं, वेट लेडी नव्हतं म्हणून मी हुश्श केलं;)
या पुढे मात्र काही सुरेख शिल्पं बघायला मिळाली.विशेषतः फ्लायिइंग मर्क्युरी हे ब्राँझमधले आणि मदर अँड चाइल्ड हे मार्बलमधले. एका दालनात सहा ऋतूंची सहा शिल्पं आहेत.मराठमोळ्या स्त्रीच्या स्वरूपात.तळाशी त्या त्या ऋतूचे वर्णन करणारी कविता.हे पूर्ण दालन अगदी पहावे असे आहे.बर्‍याच लोकप्रिय शिल्पांच्या सुबक प्रतिकृती देखील आहेत.मायकेल अ‍ॅन्जेलोचा लाडका डेव्हिड देखील होताच!
जाता येता अनेक सुरेख चित्रं दिसत रहतात.खरं तर हे म्युझियम पहायला एक दिवस पुरत नाही.
एक परमआदरणीय वस्तू इथे आहे.शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातले पत्र.ही मूळ प्रत इथे लावलेली आहे.द.मा. मिरासदारांचे शिवाजीचे हस्ताक्षर आठवलेच!
परत निघताना द्रष्ट्या कलावंत भवानराव उर्फ बाळासाहेबपंत प्रतिनिधींच्या समाधीला वंदन करून ठोसेघरला जाण्यासाठी कूच केलं.
ठोसेघरला पोचता पोचता पाच वाजून गेल्याने गर्दी अगदी कमी होती.धबधब्याचा खळाळ दुरूनच ऐकू येत होता.आधी एक ऊंचावरून कोसळणारा मोठा धबधबा आणि पुढे जाऊन देखणा लहान धबधबा दिसतो.इथे पाणी खडकातून वाहत येते.आणि निसरड्या दगडांवरून थेट दरीत उडी घेते. हा धोकादायक धबधबा आहे.इथून निसटून अनेकांनी प्राण गमावलेत.पण लक्षात कोण घेतो:( अनेक लोक रेलिंग ओलांडून अगदी लहान मुलं घेऊन धबधब्यात मजा करायला जात होते.नुसत्या डोळ्यांनी त्या धबधब्याच्या देखण्या दृश्याचा आनंद घेता येत नसावा!पण तिथे लावलेल्या बोर्डप्रमाणे लहान मुलं घसरून वाहून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असूनही लोक असे दु:साहस कसे करू शकतात कोण जाणे.
धबधबा मात्र देखणा.मोठाही आहे.खाली गोल डोहात उडी घेतो.आजूबाजूला घनदाट जंगल आहे.आणि सभोवती छोटी पिवळी फुलं उमललेली.सुरेख दृष्य आणि नामांकित स्वच्छता.डोळे निवले अगदी पाहून.





जड पावलाने बंद होण्याच्या वेळेत निघालो.येताना सज्जनगडाचे लांबूनच दर्शन घेतले.खाली समर्थसृष्टी नविनच सुरू झालंय.त्याच्या आवारातला हा मारुतीराया.


आणि आमच्या निवांत रिसॉर्टमध्ये उद्या कासला जाण्यासाठी येऊन निवांत विसावलो..
(क्रमशः)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)