जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग-५)

जेथे आशियाला युरोप मिळते. इस्तंबूल (भाग-५)

बघता बघता चार दिवस संपत आले. आजची रात्र आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ मिळणार होता. रोज जाता येता तक्सिम स्क्वेअरवरचे हाफिज मुस्तफाचे प्रसिद्ध दुकान दिसत होते. हे प्रसिद्ध आहे विविध प्रकारच्या तुर्की पुडिंग आणि डिलाइट या मिठाईसाठी.
त्यामुळे नुसता दहीभात जेवून तडक हाफिजमुस्तफामध्ये आलो. एखादे दुकान प्रसिद्ध असल्याची ग्वाही म्हणजे तिथे नुसते टूरिस्ट नाही तर स्थानिकांची गर्दी पण तितकीच असते. गुलाबी थंडीत निरनिराळ्या मिठायांवर ताव मारत दुकानाबाहेर गर्दी करुन बसलेले लोकच इथल्या अस्सलपणाची पावती देत होते. आणि दुकानाच्या आत तर मिठाईचा स्वर्गच !  निरनिराळी आकर्षक रंगाची पुडिंग शोकेसमध्ये ठेवलेली होती. शिवाय त्यांचे अतिशय आकर्षक मेन्यूकार्ड मिठायांची सचित्र  माहिती देणारे आहे. आम्ही हिरवेगार पिस्ता चाॅकलेट पुडिंग आणि कुनेफे आॅर्डर केले.  कुनेफे हे अतिशय प्रसिद्ध तुर्की डेझर्ट आहे. मोझारेल्लासारखे चिजचे सारण असणारी अतिशय खमंग पेस्ट्री साखरेच्या पाकात घालुन सर्व्ह करतात.वर पिस्त्याचे भुरभुरलेले टाॅपिंग. अतिशय चविष्ट. तुर्कीत कॅलरी विसरायच्याच!  पिस्ता पुडिंग तर अतिशय साॅफ्ट सिल्की आणि घासाघासाला दाद घेत जाणारे होते. खूप गोड झाल्यावर तिथली तुर्की काॅफी मस्ट आहे!








 पोट आणि डोळे निवल्यावर भरपूर डिलाइट खरेदी केले. डिलाइट आपल्या बदाम हलव्याची जरा कमी गोड आवृत्ती. ते विविध स्वादात मिळतात.  वर बदाम पिस्ते यांचे पातळ काप लावलेले लेमन स्वादाचे डिलाइट आम्हाला फार आवडले. असेच डाळिंबाच्या स्वादाचे जरासे आंबट आणि देखण्या गुलाबी रंगाचे डिलाइट पण मस्त.  बकलावा पण इथली खासियत. पण तो टिकला नसता. त्यामुळे त्याची खरेदी काही केली नाही. पण तिथले टर्किश काॅफी आणि हाॅट चाॅकलेटचे डबे मात्र आठवणीने खरेदी केले. एवढी  सगळी मिठाई चाखून चांगलीच गुंगी आल्यावर रूमवर जायला निघालो. तर तक्सिम स्क्वेअरमध्ये होतकरू आॅर्केस्ट्रा वेगवेगळी वाद्य वाजवून लोकांचे मनोरंजन करत होते. अतिशय छान वाजवत होते. लोक टाळ्या वाजवून दाद देत होते. हवेतली वाढती थंडी मात्र मला उभे राहू देईना. मी थंडीने थरथर कापायला लागले.मग काढता पाय घ्यावाच लागला.
सकाळी लवकर उठून निघालो. आज शेवटचा दिवस खरेदीसाठी ठेवला होता. डेस्टिनेशन ग्रँड बाजार!
काबातासवरुन ट्राम घेऊन बेयाझित स्टेशनला उतरले की समोर अनेक छोटे खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स दिसतात. इथे यायचे ते टर्किश ब्रेकफास्ट करुन मागेच असणाऱ्या ग्रँड बाजारला जाण्यासाठी!  एकोणीस दरवाजे असणाऱ्या जगातल्या सगळ्या मोठ्या बाजारांचा बाप म्हणजे हा ग्रँड बाजार. इथे फिरण्याआधी आपल्याला भक्कम ब्रेकफास्ट करणे मस्ट आहे ;)  टिपिकल टर्किश व्हेज ब्रेकफास्टमध्ये वेगवेगळे सारण असणारे अतिचविष्ट खमंग ताजे ताजे पाव आणि चिज येते. त्यासोबत अर्थातच तुर्की चाय. त्या पावाच्या खमंग सुवासानेच आधी तबियत खुष होते :) चव तर अहाहाच!


पोटपूजा करुन ग्रँड बाजारमध्ये प्रवेश केला. अनेक घुमट अनेक कमानी अनेक दुकानं वस्तूंचा लखलखाट काय बघु काय नको काय घेऊ काय नको!









फत्ते महंमदाच्या राज्यात या बाजारची प्रचंड भरभराट झाली. एकेका वस्तूसाठी गल्ल्या तयार झाल्या. सध्या इथे जवळजवळ पाच हजार दुकानं अनेक घुमट आणि कमानींखाली नांदत आहेत. अत्तर, गालिचे ,तुर्की सिरॅमिक, तुर्की चहा काॅफी सेट,दिवे, शोभेच्या वस्तू, पर्सेस असंख्य गोष्टी.  दिवाळी जवळ आलेली. मग सुंदर आॅटोमन डिझाइन असणाऱ्या पर्सेस घेतल्या. आशयला टिशर्ट घेतले. तुर्की चहा आणि काॅफिचे वैशिष्टयपूर्ण मग पण पिशवीत जाऊन बसले. गालिचाच्या दुकानदाराने पकडून सुंदर गालिचे दाखवायला सुरूवात केली.मग मात्र अचपळ मन आवरुन बाहेर पडलो.तर देखणी लेदर जॅकेट्स समोर दिसलं. अगदीच नाईलाज झाला मग झालीच खरेदी ;)
मग मात्र न थांबता परत सुलतान अहमेतला आलो. ब्लु माॅस्क आणि अया सोफियाच्या मध्ये छानशी बाग आणि कारंजे आहे. तिथे निवांत बसलो. खूपसे बघायला मिळाल्याचे समाधान आणि कोरा चर्च,एशियन साइडचा फेरफटका अशी काही ठिकाणं निसटल्याची चुटपुट अशी उजळणी करत बसलो.








काळाचा मोठ्ठा पट घेऊन इस्तंबूल वसले आहे. फारसा श्रीमंत देश नाही पण अतिशय व्यवस्थित राखलेले अवशेष, राजवाडे,म्युझियम. स्वच्छ रस्ते, सोयीची आणि शिस्तीची प्रवासव्यवस्था.  प्राचीन  वास्तू , गुलाबी हवा, खरेदीची कमाल आणि खाण्यापिण्याची धमाल. इस्तंबूल हे खरंच खिशाला परवडणारे परफेक्ट टूरिस्ट डेस्टिनेशन आहे यात शंकाच नाही.
पूर्ण तुर्कस्तानामध्ये अनेक ठिकाणे बघण्यासारखी आहेत.ती आणि इस्तंबूलमधली निसटलेली ठिकाणं असा अजून एक प्रवास नक्की होणार आहे. तो घेऊन येईनच. तोवर gule gule म्हणजेच तुर्की गुडबाय!





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राणीच्या देशात - बेकवेल

माझी इटलीची भ्रमणगाथा ( भाग -९)

माझी इटलीची भ्रमणगाथा (भाग २)